शुभांगी जुमळे

विसाव्या शतकातील महान विचारवंत व तामिळनाडूच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीचे शिल्पकार इरोड वेंकटप्पा रामास्वामी (पेरियार) यांचा दक्षिण भारतीय समाजजीवनावर मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांनी केलेले समाजोद्धाराचे क्रांतिकारक कार्य व वैचारिक योगदानामुळे त्यांना तत्त्वज्ञ आणि चिंतक व्होल्टेअरच्या बरोबरीने स्थान दिले जाते.
भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणामध्ये पेरियार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. जून १९७० मध्ये युनेस्कोने त्यांना आधुनिक युगाचा दृष्टा पुरुष, दक्षिण-पूर्व आशियाचा सॉक्रेटिस, समाजसुधारणावादी चळवळीचा पितामह तसेच अंधश्रद्धा, रूढीवादी आणि निरर्थक प्रथा-परंपरांचा कट्टर विरोधक म्हणून गौरव केला.कम्युनिझमपासून ते दलित चळवळ, तामिळ राष्ट्रवाद, बौद्धिकता आणि स्त्रीवाद या सर्व प्रवाहांतील लोक त्यांचा आदर करतात. एवढेच नाही तर त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहतात.
हिंदू धार्मिक कुटुंबात जन्मलेले पेरियार हे धर्माचे कट्टर विरोधक होते. बालपणापासून त्यांनी ब्राह्मणवाद आणि हिंदू धर्मातील असमानतेवर आधारलेल्या रूढी-परंपरांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यांचा ना मूर्तिपूजेवर विश्वास होता, ना वेद आदी तत्त्वज्ञानावर.पेरियार हे समाजपरिवर्तनाचा आग्रह धरत होते. समाजात धर्माच्या नावावर नाकारल्या जाणाऱ्या मूलभूत हक्कांसाठी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. त्यांनी महिलांच्या मूलभूत हक्कांची मागणी केली.
आजच्या पितृसत्ताक समाजामध्येही महिलांसाठी त्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. महिलांच्या स्वातंत्र्याला संकुचित करणाऱ्या प्रतिगामी वैचारिक प्रवृत्तींचा त्यांनी विरोध केला.त्यांची राजकीय बांधणी ही स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित होती. या मूल्यांच्या आधारेच त्यांनी महिलांसंबंधी आपल्या वैचारिक प्रक्रियेला आकार दिला.१९२४ मध्ये केरळमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी प्रमुख भूमिका निभावली. त्यावेळी त्यांची प्रतिमा तामिळनाडूत व्यापक झाली होती. त्यांना ‘वायकोम नायक’ ही पदवी देण्यात आली.दलित, हरिजन आणि महिलांकरिता त्यांनी ‘सेल्फ रिस्पेक्ट’ अर्थात ‘स्वाभिमानी आंदोलन’ किंवा ‘आत्मसन्मान आंदोलन’ चालविले. या आंदोलनातून तामिळ आणि दक्षिण भारतीय समाजात सामाजिक व वैचारिक क्रांती सुरू झाली. समाजातील मोठा समूह समाजसुधारणेसाठी तयार झाला व जस्टिस पार्टीचा उदय झाला.केरळमधील मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. लोकांचे लोकनायक ठरलेला वायकोम सत्याग्रह हा ब्राह्मणवादाच्या विरोधात होता आणि पेरियार हेदेखील ब्राह्मणवादाच्या विरोधात स्पष्टपणे बोलणारे होते.
स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयी त्यांची भूमिका स्पष्ट होती. ते बालविवाहाचे विरोधक होते. विधवा पुनर्विवाहाला त्यांचा पाठिंबा होता. मुलींनी शैक्षणिक प्रगती केली पाहिजे, असे त्यांचे मत होते. विवाहानंतर संतती जन्माला घालण्याचा किंवा संतती प्रतिबंधाचा अधिकार स्त्रीला स्वतःला असावा, असे ते मानत. स्त्रीशिक्षणाला आणि त्याच्या शैक्षणिक मूल्याला समाजातील लोकांनी महत्त्व द्यावे, अशी त्यांची वैचारिक भूमिका होती.पेरियार स्त्रीवादी होते. स्त्रियांची मुक्ती आणि स्वाभिमानी चळवळ यासाठी ते आयुष्यभर लढले. दलितांच्या शोषणाविरुद्धही त्यांनी आवाज उठवला.१९३८ मध्ये महिलांचे हक्क आणि अधिकार याविषयी अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात रामासामी यांना ‘पेरियार’ ही पदवी देण्यात आली.महिला मुक्ती आणि स्त्रीशिक्षण यांना त्यांनी विशेष महत्त्व दिले. महिलांनी शिक्षण घेऊन समाजातील रूढी-अंधश्रद्धांपासून स्वतःला दूर ठेवावे आणि आपल्या जीवनात शैक्षणिक, वैज्ञानिक व वैचारिक दृष्टिकोन स्वीकारून समाजात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करावे, असा त्यांचा आग्रह होता.
पेरियार यांचे आत्मसन्मान आंदोलन धर्मनिरपेक्ष होते आणि सामाजिक समानता मिळविण्याच्या प्रयत्नात ते लढाऊ होते. महिलांचा सार्वजनिक कार्यातील सहभाग वाढावा म्हणून महिला कार्यकर्त्या के. व्ही. कामत्वी, नागामाई, के. ई. वीरा, कल्याणी, मूवलूर रामामृतम्माई, एस. आर. कन्नम्मल आदींचा या चळवळीत सहभाग होता.१९३० मध्ये कौटुंबिक मालमत्तेच्या बाबतीत मुला-मुलींचा समान हक्क, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन, विधवांचे पुनर्विवाह, स्त्रीला कायदेशीर घटस्फोटाचा अधिकार तसेच देवदासी प्रथेसंदर्भातील निर्णय याबाबत ठराव संमत करण्यात आले.स्त्रीला तिच्या इच्छेनुसार मातृत्व स्वीकारायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार असावा, असा पेरियार यांचा वैचारिक दृष्टिकोन होता. सामाजिक व्यवस्थेत बदल घडवून नवा, आधुनिक, समतामूलक आणि स्त्रीवादी समाज निर्माण करण्याची त्यांची भूमिका होती. समाजातील स्त्रीला आधुनिकतेकडे घेऊन जाणारे त्यांचे विचार क्रांतिकारक होते.म्हणूनच पेरियार यांच्या जन्मदिनी ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून त्यांची जयंती साजरी केली जाते.
शुभांगी जुमळे

Leave a Reply