कॉकरोच जनता पार्टीचा अचानक झालेला उदय अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू झाली, अभिजीत दिपके यांचे व्हिडिओ फिरू लागले, काही मुलाखती आल्या, आणि लगेचच अनेकांनी याला भारतातील ‘जेन झी’ पिढीच्या बंडाची सुरुवात म्हणून पाहण्यास सुरुवात केली. आजचा भारतीय तरुण अस्वस्थ आहे, हे नाकारता येणार नाही. वाढती बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतला भ्रष्ट्राचार, परीक्षा- पेपरफुटी-निकालांवर शंका यातून निर्माण झालेली अनिश्चितता आणि त्यापुढे रहाणीमान टिकवणे, नोकरीचा शोध, वाढती महागाई असे अनेक प्रश्न. या सर्व स्थितीत राजकीय वर्गाकडून तरुणांना आश्वासनाखेरीज फारसे काही मिळत नाही. अशा परिस्थितीत युवा पिढीच्या रागाला आवाज मिळाला तर तो निश्चितपणे लोकप्रिय होणारच.
कॉकरोच जनता पार्टीने नेमके हेच केले आणि तरुणांच्या अपमानाला नवी भाषा दिली. तरुणांच्या मनातील खदखद आणि व्यथा कधी उघडपणे, कधी उपरोधाने, कधी रागाने, कधी मीमच्या भाषेत सांगणे सुरू केले. यातूनच या नव्या पार्टीचा वेगाने प्रसार झाला. पण सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद आणि राजकीय चळवळीची निर्मिती हे दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. आजच्या काळात एखादा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो; पण त्याच लोकांना एखाद्या सभेला, बैठकीला किंवा दीर्घ राजकीय कार्यक्रमाला आणणे खूप आव्हानात्मक असते. ऑनलाईन फॉलोअर्स आणि जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते एकच नसतात. टिका करणारी सोशल मिडिया वरची पोस्ट शेअर करणारा नागरिक आणि संघटित राजकीय कार्यक्रमात सक्रिय असणारी व्यक्ती यात कमालीचा फरक असतो.
सध्या कॉकरोच जनता पार्टी मधल्या टप्प्यात उभी आहे. तिच्याकडे सोशल मिडिया वरचे प्रभावी अस्तित्व आहे, आवाज आहे, चेहरा आहे, आणि प्रचंड उत्सुकता आहे. पण याच वेळी स्पष्ट राजकीय विचार आणि कृती कार्यक्रम, स्थानिक संघटना, विविध राज्यांतील तरुणांना जोडणारी रचना, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जात, वर्ग, भाषा, प्रदेश, शिक्षण आणि रोजगार यांच्या गुंतागुंतीशी सामना करण्याची तयारी आहे का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. प्रवक्ते नेमणे, निवेदने देणे, याचिका करणे किंवा आंदोलनाची घोषणा करणे ही सुरुवात आहेच; परंतु ते खऱ्या अर्थाने चळवळीचे लक्षण मानता येत नाही.
या घटनाक्रमाकडे पाहताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोणतीही चळवळ सत्तेविरूद्ध बोलते म्हणून ती आपोआप सत्तेला धक्का देत नसते. कधी कधी एखादी चळवळ तीव्र भाषा वापरत असते, पण परिणामांच्या पातळीवर ती व्यवस्थेला फारसा त्रास देत नाही. या उलट ती लोकांच्या असंतोषाला एक सुरक्षित वाट देते. यातूनच लोक राग व्यक्त करतात, खिल्ली उडवतात, सोशल मिडिया वर मीम करतात, व्हिडिओ शेअर करतात, काही दिवस चर्चेत राहतात, आणि मग नव्या घडामोडी होत राहतात आणि विषय बदलत राहतो. हे सर्व होत असताना व्यवस्था मात्र जागच्या जागी राहते.
कॉकरोच जनता पार्टीबद्दलही हाच प्रश्न विचारला पाहिजे. ती खरोखर तरुणांच्या राजकीय फळीच्या उभारणीची सुरुवात आहे का? की ती फक्त तरुणांच्या बंडाची एक डिजिटल प्रतिमा आहे— मोठा आवाज, प्रभावी डिजिटल व्यवस्था, पण राजकीय परिणाम मर्यादित?
असे प्रश्न विचाराने सध्या अधिक महत्त्वाचे आहे, कारण दक्षिण आशियात अलीकडच्या काळात तरुणांच्या म्हणजे जेन झेड पिढीच्या बंडाची एक नवी कल्पना लोकप्रिय झाली आहे. नेपाळ आणि बांग्लादेशातील घडामोडींनी अनेकांना दाखवून दिले की तरुणांचा राग, डिजिटल पातळीवर संवाद आणि याचा परिणाम होत रस्त्यावर सुरु झालेले प्रदर्शन यातून प्रस्थापित व्यवस्थांना हादरा दिला जाऊ शकतो. सामाजिक माध्यमांवरील निर्बंध, भ्रष्टाचार, बेरोजगारी, राजकीय वर्गाचा अंहकार आणि लोकशाही संस्थांवरील अविश्वास—या गोष्टींनी या दोन्ही देशांतील तरुणांना पेटवले. हे बघून भारतातही काहींना वाटू लागले की भाजपाचे दीर्घकाळ टिकलेले वर्चस्व कदाचित एखाद्या अशाच तरुण बंडाने आव्हानात येईल.
ही अपेक्षा निर्माण होण्याचे एक कारण भारतातल्या विरोधी पक्षांचे अपयश आहे. भाजपाला रोखण्यासाठी लागणारी संघटना, सातत्य, विचारसरणी, प्रचारयंत्रणा आणि जमिनीवरच्या यंत्रणेतून सामाजिक पोहोच विरोधकांकडे पुरेशा प्रमाणात दिसत नाही. निवडणुकांपूर्वी आघाड्या होतात, सभा होतात, आरोप-प्रत्यारोप होतात; पण भाजपाने समाजाच्या खोलवर उभारलेली राजकीय पकड सहज सैल होत नाही. त्यामुळे अनेकांना पक्षीय राजकारणापेक्षा बाहेरून येणार्या अचानक सामाजिक उद्रेकात आशा दिसू लागते. कधी शेतकरी आंदोलनाकडे आशेने पाहीले जाते, कधी विद्यार्थी चळवळींकडे, कधी शहरी समाजाकडे, आणि सध्या ‘जेन झी’कडे राजकीय बदलासाठी डोळे लावून बसलेले नागरिक दिसतात.
पण सत्तेचे राजकारण इतके प्रकट नसते. एखादे बंड प्रत्यक्षात जमिनीवर उभे राहण्याआधीच त्याची मोठी प्रतिमा तयार झाली, तर सत्तेतल्या व्यवस्थेला त्या प्रतिमेवर वेगात काम करता येते. प्रत्यक्ष बंड होण्याची शक्यता अनिश्चित असते. ते कुठे उभे राहील, कोणत्या प्रश्नावर उभे राहील, कोण त्याचे नेतृत्व करेल, ते कोणत्या सामाजिक गटांना जोडेल हे आधी सांगता येत नाही. पण जेव्हा बंडाची डिजिटल प्रतिमा स्पष्ट असते, सोशल मिडिया वर अकाउंट असतात, हॅशटॅग असतो, चेहरा असतो, व्हिडिओ असतात, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती सर्वत्र दिसत असते तेव्हा त्यावर नजर ठेवता येते. जे दिसते, त्याची खिल्ली उडवता येते, त्याला रोखता येते, त्यावरची चर्चा हवी तशी वाढवता किंवा वळवता येते.
याउलट, जमिनीवर उभी राहणारी चळवळ वेगळी असते. कारण ती महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या चर्चेतून तयार होते, बेरोजगार तरुणांच्या गटांत तयार होते, ती परीक्षार्थ्यांच्या संघटनांत तयार होते. ती गावांमध्ये, वसाहतींमध्ये, कामगारांच्या वास्तवात आणि स्थानिक संघर्षांतून तयार होते. ती डिजिटल जगात उशिरा दिसते. जोपर्यंत सामाजिक मुळे घट्ट तयार करत नाही तो पर्यंत अशी चळवळ बांधली जात नसते. अशा पद्धतीने तयार झालेली चळवळ हाताळणे कठीण असते, कारण ती फक्त एका अकाउंटवर, एका व्यक्तीवर किंवा सोशल मिडिया वरच्या विडंबनावर अवलंबून नसते.
कॉकरोच जनता पार्टीची अडचण अशी आहे की ती बांधली जाण्याच्या आधीच सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहे. तिची प्रतिमा तिच्या संघटनेच्या आधी तयार झाली आहे. हा क्रम धोकादायक असतो. चळवळीचा सामान्य क्रम असा असतो की आधी प्रश्नांची मांडणी होते, मग लोक जोडले जातात, मग संघटना तयार होते, मग कार्यक्रम तयार होतो, आणि शेवटी मोठा सार्वजनिक उद्रेक दिसतो. येथे मात्र आधी सार्वजनिक उद्रेकाची प्रतिमा तयार झाली. सोशल मीडियाने तिला वेग दिला. पण त्या वेगाला खोलवर आधार देणारी संघटन रचना अजून सिद्ध व्हायची आहे. या सर्व प्रकारात राजकीय संवेदना आणि जाणीवा जाग्या होण्याची प्रक्रिया तर अजिबात दिसत नाही. फक्त शाब्दिक वापरातून बसलेला भावनिक धक्का आणि त्यातून तयार झालेला राग यातूनच चळवळ तयार करण्याची प्रक्रिया एक प्रकारची राजकीय उद्योजकता आहे.
याचा अर्थ कॉकरोच जनता पार्टी महत्त्वाची नाही असा अजिबात नाही. आजच्या तरुणाला वारंवार सांगीतले जाते की मेहनत करा, कौशल्य वाढवा, स्पर्धा परीक्षा द्या, स्टार्टअप करा, डिजिटल व्हा. पण त्याला स्थिर नोकरी नाही, परीक्षा सुरक्षित नाहीत, शिक्षण स्वस्त नाही, आणि भविष्य स्पष्ट नाही. त्याच्या असंतोषाला राजकीय भाषा मिळत नसल्याने तो उपरोध, विनोद आणि अपमानाच्या भाषेत बाहेर पडतो. कॉकरोच जनता पार्टीने याच भावनेला पकडले आहे. पण राजकीय भाषा केवळ अपमानावर टिकत नाही. ती प्रश्न विचारते, कारणे शोधते आणि पर्याय सुचवते. बेरोजगारी आहे, पण ती का आहे? परीक्षा व्यवस्था कोसळते, पण जबाबदार कोण? शिक्षण खासगिकरणाकडे का ढकलले जाते? सरकारी नोकर्यांची संख्या कमी का होते? तरुणांना धर्म, राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक अभिमानाच्या भाषेत का गुंतवले जाते, पण रोजगाराच्या प्रश्नावर ठोस उत्तर का दिले जात नाही? कॉकरोच जनता पार्टीने जर या प्रश्नांकडे गंभीरतेने पाहीले नाही, तर ती फक्त रागातून तयार झालेले सोशल मिडिया वरचे व्यासपीठ राहील आणि राजकीय चळवळ होणार नाही.
भारतात अशा प्रतीकात्मक उद्रेकांचा इतिहास आहे. तब्बल पंधरा वर्षांपूर्वी जन लोकपाल आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध उभे करण्यात आले होते. त्या वेळी काँग्रेसविरोधी वातावरण होते आणि भ्रष्टाचाराला धरून एका राजकीय पक्षाला लक्ष्य करण्यात आले होते. अस्वस्थ शहरी मध्यमवर्गाचे प्रश्न हिरीरीने मांडणारा मिडिया आणि दूरचित्रवाणी माध्यमांनी या आंदोलनाला प्रचंड दृष्यता दिली. उपोषणे, मेणबत्ती मोर्चे, स्वच्छ राजकारणाची भाषा आणि नैतिक राग या सगळ्यांनी एक मोठा प्रभाव तयार केला. यातून भ्रष्टाचार विरोधी विशेष कृती घडल्या नाहीत. उलट राजकीय पक्ष आणि खाजगी क्षेत्र यांचे साटेलोटे असणारे आणि कायद्याच्या कचाट्यात न पकडले जाऊ शकणारे भ्रष्टाचाराचे नवे प्रकार समोर आले. त्या आंदोलनातून आम आदमी पक्ष जन्माला आला आणि आंदोलनाचे मूळ उद्देश बाजूला गेले. याच वेळी राष्ट्रीय पातळीवर त्या भ्रष्टाचार विरोधी भावनेचा सर्वांत मोठा लाभ भाजपाने घेतला. कारण भाजपकडे त्या रागाला मतांमध्ये रूपांतरित करण्याची संघटना होती.
ही गोष्ट आजच्या संदर्भात महत्त्वाची आहे. एकांगी सार्वजनिक राग हा राजकीय शक्ती नसतो. तो कोणाच्या हातात जातो, कोण त्याला दिशा देतो, कोण त्यातून संघटना बांधतो, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. जन लोकपालने भ्रष्टाचार हा मुख्य प्रश्न केला; पण भ्रष्टाचाराच्या पलीकडील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय रचना कितपत बदलल्या? कॉकरोच जनता पार्टी तरुणांचा अपमान, बेरोजगारी आणि व्यवस्थेविरोधी चीड यांना आवाज देते; पण त्याचे रूपांतर व्यापक सामाजिक कार्यक्रमात होऊ शकते का? किंवा तशा इच्छा आहेत का? हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. या उलट, जन लोकपाल च्या काळात विरोधी पक्ष म्हणून भाजप सक्षम होता. सध्याचा विरोधी पक्ष अत्यंत विभागलेला, कमकुवत आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या निर्मितीतून काही विशेष राजकीय बदलाच्या शक्यता करणे सध्या तरी धाडसाचे ठरेल.
इथे एक बाब स्पष्ट आहे की कॉकरोच जनता पार्टी जन लोकपालची पुनरावृत्ती नाही. कारण आता काळ बदलला आहे, माध्यमे आणि भाषा बदलली आहे. पंधरा वर्षांपूर्वी टी व्ही चॅनेल्सवरून आंदोलनाची प्रतिमा तयार होऊ शकत होती. आज ती रील्स, मीम, एक्स, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपवरून जास्त तयार होते. तेव्हा उपोषण हे मोठे नैतिक शस्त्र होते आणि हजारे सारखे ब्रांड तयार केले गेले होते. आजच्या काळात उपरोध किंवा मिम्स हे डिजिटल शस्त्र आहे. तेव्हा स्वच्छ राजकारणाची भाषा होती जी आज अपमानित तरुणांच्या रागाची भाषा आहे. तरीही दोन्हींत एक समान धागा आहे तो म्हणजे राजकीय संघटनेऐवजी प्रतीकात्मक उद्रेकावर नको इतका भर.
याचा फायदा नक्की कोणाला होतो? हा सध्या सर्वांत कठीण आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपाला सार्वजनिक पातळीवरील टिका आणि राग नवा नाही. पक्षाने स्वत: अनेकदा रागाचे राजकारण केले आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर भाजपाला राग कसा उभा करायचा, कसा वळवायचा, कसा निवडणुकीत वापरायचा, हे पूर्ण माहित आहे. त्यामुळे फक्त रागातून तयार केलेली चळवळ भाजपाला हादरवेल, असे मानणे भोळेपणाचे ठरेल. भाजपाला अडचण निर्माण होईल ती संघटित, सातत्य पूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या खोलवर रूजलेल्या रागाने. कारण असा राग वेगवेगळ्या गटांना जोडतो आणि प्रभावी राजकीय प्रवाह तयार करतो. वास्तविक पातळीवर जो तरुणांच्या बेरोजगारीला शेतकर्यांच्या कर्जाशी, विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नाला शिक्षणातील विषमतेशी, महागाईला वेतनाच्या प्रश्नाशी, आणि धार्मिक ध्रुवीकरणाला आर्थिक असुरक्षिततेशी जोडतो, असा राग काहीतरी आशादायक बदल घडवू शकतो.
अर्थात अशी चळवळ निर्माण होणे सोपे नाही. पण तीच खरी राजकीय चळवळ असते. ती केवळ सोशल मीडियावरील असंतोष वापरून सत्तेला आव्हान देत नाही. डिजिटल जगात सत्ताधारी गटांना अशा प्रकारच्या डिजिटल चळवळीचे मोजमाप करता येते. नक्की कोण बोलते, किती लोक बोलतात, कोणत्या भाषेत बोलतात, कोणत्या शहरांतून बोलतात, कोणत्या वर्गातून बोलतात, हे सर्व डिजिटल जगात दिसत असते. त्यामुळेच डिजिटल बंडाचे नियंत्रण तुलनेने सोपे असते. यात कधी खाते बंद करता येते, कधी ट्रोलिंग करता येते, कधी नेत्यावर वैयक्तिक हल्ला करता येतो, कधी आंदोलनाला अपरिपक्व म्हणता येते, कधी परकीय प्रभावाचा आरोप करता येतो. अशा अनेक पद्धतींनी डिजिटल रागाला कमकुवत करता येते.
कॉकरोच जनता पार्टीने जर जमिनीवरची संघटना तयार केली नाही, तर ती याच सापळ्यात अडकू शकते. तिचे खाते बंद झाले, नेता बदनाम झाला, मीम तयार करणाऱ्या तरुणांचा उत्साह कमी झाला, आणि माध्यमांचे लक्ष दुसरीकडे गेले, तर काय? हा प्रश्न प्रत्येक डिजिटल चळवळीसमोर उभा राहतो. कारण इंटरनेटवर वेग असतो, पण स्मृती एकदम कमी असते. आजचा राग उद्याच्या ट्रेंडमध्ये हरवतो. गंभीर राजकारणाला मात्र दीर्घ स्मृती आवश्यक असते, सातत्य लागते. आणि छोटे पराभव सहन करण्याची ताकद वापरून लोकांमध्ये पुन्हा पुन्हा जाण्याची तयारी लागते.
कॉकरोच जनता पार्टीचा विचार करताना ‘जेन झी’ या शब्दाबद्दलही थोडे सावध राहण्याची गरज आहे. कारण भारतातील तरुण यांनी त्यांची ओळख आणि प्रश्न हे एकसारखे नाहीत. मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू किंवा हैदराबादमधील इंटरनेटवर सक्रिय तरुण आणि विदर्भातील, बिहारमधील, झारखंडमधील, मराठवाड्यातील किंवा उत्तर प्रदेशातील छोट्या शहरातील बेरोजगार तरुण यांच्या चिंता आणि सद्यपरिस्थिती वेगळ्या आहेत. इंग्रजीत राजकीय मीम बनवणारा तरुण आणि सरकारी भरतीची वाट पाहणारा ग्रामीण विद्यार्थी यांची भाषा आणि प्रश्न वेगवेगळे आहेत. जात, धर्म, प्रदेश, वर्ग, शिक्षण, लिंग आणि डिजिटल माध्यमाची उपलब्धता या सर्व गोष्टी तरुणांच्या अनुभवाला आकार देतात आणि मग सहभागाचे स्वरूप ठरते. त्या अर्थाने जनलोकपाल सुद्धा शहरी मध्यमवर्गीय युवा पिढीचे आंदोलन होते. त्यामुळे फक्त ‘युवा पिढीचा राग’ असा एकच शब्द वापरला की भारतातले वैविध्यपूर्ण वास्तव लपून जाते.
कॉकरोच जनता पार्टीची मुख्य ताकद आहे मीम राजकारणाचा उदय. मिम्स किंवा उपरोधिक शैलीने केलेली टिका सोशल मीडियातून पटकन पोहोचते. हे करताना भीती कमी असते, आणि सोप्या पद्धतीने सत्तेची खिल्ली उडवत तरुणांना जोडण्यात ती यशस्वी होते. पण या पद्धतीच्या राजकारणाच्या मर्यादाही आहेत. मिम्स भले गुंतागुंतीच्या प्रश्नांना सोपे करते पण ते कधी कधी जास्तच सोपे करत मूळ प्रश्नांची व्याप्ती आणि गांभीर्य हरवून टाकते. जातीय अन्याय, आर्थिक विषमता, धार्मिक ध्रुवीकरण, शिक्षणातील व्यापारीकरण, बेरोजगारीची रचना, माध्यमसत्तेचे नियंत्रण, असे विषय मीममध्ये अचूक बसतात. पण यातून पूर्ण विषय समजत नाहीत. त्यासाठी अभ्यास, चर्चा, संघटन आणि राजकीय कार्यक्रम लागतो. कॉकरोच जनता पार्टीला जर खरोखर टिकायचे असेल, तर तिला मीमच्या ऊर्जेला राजकीय शिक्षणात रूपांतरित करावे लागेल.
सध्या कॉकरोच जनता पार्टीसमोर दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे सोशल मीडियावर तीक्ष्ण भाषा वापरणे, सत्तेवर टीका करणे, तरुणांच्या रागाला प्रतिनिधित्व देणे, आणि डिजिटल लोकप्रियता टिकवण्याचा प्रयत्न करणे. हा मार्ग वेगवान आहे, दृश्य आहे, पण लवकर थकणारा आहे. दुसरा मार्ग कठीण आहे. महाविद्यालयांमध्ये जाणे, बेरोजगार तरुणांचे स्थानिक गट तयार करणे, परीक्षा सुधारणा, रोजगार, शिक्षण, महागाई, डिजिटल स्वातंत्र्य, सामाजिक न्याय यांवर स्पष्ट कार्यक्रम देणे, आणि वेगवेगळ्या सामाजिक गटांना जोडणे. हा मार्ग वेगवान नाही, कमी ग्लॅमरस आहे, पण राजकीयदृष्ट्या अधिक गंभीर आहे.
भाजपला पहिला मार्ग फारसा घाबरवणार नाही. कारण भाजपने डिजिटल राजकारणात प्रचंड गुंतवणूक केली आहे. प्रतिमा, प्रचार, भावनिक भाषा आणि ऑनलाइन संघर्ष यांचे महत्त्व कळलेला पक्ष म्हणून भाजप परिचित आहे. पण दुसरा मार्ग भाजपसाठी कठीण होऊ शकतो. कारण स्थानिक पातळीवर प्रश्न उभे केले तर तरुण फक्त रागावलेले प्रेक्षक न राहता सक्रीय राजकीय नागरिक बनतील. निवडणुकीच्या घोषणांनंतर नोकऱ्या कुठे गेल्या? पेपरफुटीला जबाबदार कोण? शिक्षणाचे व्यापारीकरण कोणाच्या फायद्यासाठी? धार्मिक उत्साहात तरुणांचे भविष्य का हरवत आहे? हे प्रश्न विचारणारी चळवळ सत्तेला निश्चित अस्वस्थ करू शकते. याचवेळी डिजिटल अस्तित्व वापरून स्वतः चळवळ न बांधता तरुणांच्या उर्जेला वापरून स्वतःची राजकीय उद्योजकता यशस्वी करण्याचे दुसरे उदाहरण तयार झाले तर लोकांमध्ये नैराश्य पसरेल यात शंका नाही.
कॉकरोच जनता पार्टीबद्दल अंतिम निर्णय देण्याची वेळ अजून आलेली नाही कारण ही राजकीय चळवळ नवीन आहे. तिच्यात उत्साह, डिजिटल क्रांतीची भाषा, आणि काही प्रमाणात धाडसही आहे. सध्या ती मीम राजकारणाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे कारण सध्या प्रवक्ते, याचिका, आंदोलनाची योजना असा कार्यक्रम समोर येत आहे. अर्थात, भारतात राजकीय चळवळ उभी करणे म्हणजे फक्त व्हायरल होणे नाही. त्यासाठी लोकांचा विश्वास जिंकणे, वेगवेगळ्या प्रदेशांत काम करणारे कार्यकर्ते तयार करणे, टीकेबरोबर पर्याय देणे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रागाला राजकीय जबाबदारीत रूपांतरित करणे.
आजच्या भारताला तरुणांच्या रागाची नक्कीच गरज आहे; पण फक्त राग पुरेसा नाही. रागाला विचाराची साथ लागते. विचाराला संघटनेची साथ लागते. संघटनेला लोकशाहीची शिस्त लागते. कॉकरोच जनता पार्टी या प्रवासाला निघेल का, की ती डिजिटल क्षण म्हणूनच थांबेल, हा निर्णायक प्रश्न आहे.
भाजपच्या दृष्टीने पाहिले तर ही चळवळ त्यांना दोन प्रकारे उपयोगी पडू शकते. एक म्हणजे ती तरुणांच्या रागाचे एक नियंत्रित रूप दाखवते. यातून भाजप राजकीय कृतीकार्यक्रम देऊन कॉकरोच जनता पार्टीच्या आरोपांतील हवा सोप्या पद्धतीने काढून स्वतःचे राजकीय भांडवल वाढवू शकेल. दुसरे म्हणजे सत्ताधारी गट म्हणून अशा डिजिटल बंडाला हाताळून दाखवण्याची संधी पक्षाला सक्षम करू शकते. त्यामुळे भाषेत भाजपविरोधी असलेली चळवळ त्यांचे राजकीय नुकसान न करता भाजपला एका अर्थाने मदत करू शकते. ही शक्यता फक्त आरोप म्हणून नव्हे, तर राजकीय परिणामांच्या विश्लेषणातून पाहणे गरजेचे आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या रूपाने युवा पिढीच्या बंडाबाबतची राजकीय अनिश्चितता संपली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तरुणाईच्या बंडाच्या शक्यता बोलल्या जात होत्या. असे वातावरण भाजपसारख्या पक्षाला अनावश्याक चिंतेंत टाकणारे होते. या उलट कॉकरोच जनता पार्टी समोर आल्याने भाजप आता त्या जुन्या सतावणाऱ्या बंडाच्या शक्यातातून बाहेर येऊन हे नवे बंड सक्षमपणे हाताळण्याची शक्यता तयार झाली आहे. अशा पद्धतीने कॉकरोच जनता पार्टीचे आगमन भाजपसाठी शुभ ठरले असण्याची शक्यता जास्त आहे.
भारताला आज आणखी एका प्रतीकात्मक क्रांतीची गरज नाही. त्याला गंभीर, धैर्यवान, विचारशील आणि संघटित तरुण राजकारणाची गरज आहे. कॉकरोच जनता पार्टी त्या दिशेने पहिले पाऊल ठरू शकते. पण त्यासाठी तिला स्वतःला डिजिटल प्रतिमेच्या मोहातून बाहेर काढावे लागेल. अन्यथा ती भाजपविरोधी घोषणांनी सजलेली, पण भाजपला उपयोगी पडणारी आणखी एक सुरक्षित बंडाची प्रतिमा ठरेल. आजच्या भारतीय राजकारणात प्रतिमा व वास्तव यांचा फरक ओळखणे, कदाचित लोकशाहीचे पहिले कर्तव्य झाले आहे.
~ डॉ. गोविंद धस्के आणि गायत्री सुतार
~ डॉ. गोविंद धस्के अमेरिकेतल्या युनिव्हार्सिटी ऑफ मोन्टाना इथे समाजकार्य शिकवतात आणि गायत्री सुतार या मुंबईस्थित मुक्त पत्रकार आहेत.

Leave a Reply