मराठी अभ्यास केंद्र’ आणि मराठी भाषेसाठी लढणाऱ्या सर्व साथीदारांना,
जय मराठी !
आपण मराठी भाषा , मराठी शाळा टिकाव्यात , वाढाव्यात यासाठी करीत असलेली मेहनत, सामाजिक आंदोलन आणि चिकाटी खूप कौतुकास्पद आहे. संबंध महाराष्ट्रावर वैचारिक गुलामीचा ‘गाढवाचा नांगर’ फिरवला जात असताना आपण करीत असलेले काम मराठी मनाला ऊर्जा आणि चेतना देणारे आहे .
आज महाराष्ट्रावर आणि मुख्यतः मराठी बहुजन समाजावर (ज्यामध्ये सर्व धर्मातील मराठी ओबीसी , अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती, भटका विमुक्त समाज यांचा समावेश होतो ) भाजप -R.S.S प्रणित ‘हिंदी, हिंदू, हिंदूस्थान ‘ याच्या गाय गोबर पट्ट्याचे राजकारण , समाजकारण आणि विचारधारा लादण्याचे कारस्थान आपण सर्व पाहत आहोत. यामध्ये सर्वात मोठे नुकसान मराठी बहुजन समाजाचे होणार आहे . आज मराठी बहुजन समाज आणि विशेषतः मराठी ओबीसी समाज या भाजप आणि R.S.S यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा मोठा समर्थक वर्ग बनला आहे. याचे कारण या बहुजन ओबीसी समाजाकडे त्याची नेमकी सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिती काय आहे याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही . ही माहिती (डेटा) जर मराठी बहुजन ओबीसी समाजाकडे नसल्याने तो भाजप आणि R.S.S यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा अंध भक्त बनून त्यांच्या राजकारणाचा वाहक बनलेला आहे . यासाठी ओबीसी समाजाची जातीय जनगणना अतिशय गरजेची आहे .
या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल आणि खऱ्या अर्थाने मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल तर मराठी बहुजन समाजाचे आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठी बहुजन समाजाचे जातीय जनगणनेचे प्रश्न मराठी भाषिक चळवळीने उचलणे गरजेचे आहे.
मराठी ओबीसी समाजाची आर्थिक , राजकीय आणि शैक्षणिक माहिती उपलब्ध नसणे , या समाजाची जातीय जनगणना न होणे यातून मराठी ओबीसी समाजातून ‘हिंदी , हिंदू, हिंदुस्थान’ च्या राजकारणाला मानणारा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक हिंसक अंध गुलाम वर्ग आज महाराष्ट्रात तयार झाला आहे. पुढे याच मराठी बहुजन हिंसक अंध वर्गाला हाताशी धरून मराठीकारणाची आणि महाराष्ट्र धर्माची चळवळ मोडून काढली जाईल यात तिळमात्र शंका नाही .
हा धोका टाळायचा असेल आणि शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ‘मराठी जनतेचे आणि महाराष्ट्राचे गोमटे ‘ करायचे असेल तर मराठी भाषेसाठी लढणाऱ्या चळवळींनी जातीय जनगणनेचा मुद्दा उचलून धरलाच पाहिजे. माझ्यासारखे अनेक मराठी बहुजन समाजातील सुशिक्षित तरुण मराठी कारणासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी लढायला तयार आहेत आणि त्याची गरज देखील ओळखून आहेत . परंतु मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्माची चळवळ चालवणाऱ्या आमच्या साथीदारांना ओबीसी जनगणनेचा मुद्दा मराठी बहुजन समाज आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी किती महत्वाचा आहे याची कितपत जाणीव आहे याचा आम्हाला प्रश्न पडतो.
आम्ही अशी आशा करतो की मराठी भाषेची चळवळ ही मराठी बहुजन समाजाच्या हिताची आहे आणि मराठी बहुजन ओबीसी समाजाची जातीय जनगणना हा देखिल तितकाच कळीचा प्रश्न आहे याची जाणीव मराठी भाषा, मराठी शाळा महाराष्ट्र धर्मासाठी लढणारी आमच्या साथीदारांना होईल .
महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी जनता ही बहुजन मराठी असून मराठी बहुजन समाजाच्या जातीय जनगणनेचा प्रश्न हा मूलभूतपणे मराठी माणसाचाच प्रश्न आहे . बहुजन मराठी समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष करून मराठी भाषा आणि मराठी समाज या दोघांचा उत्कर्ष होणे शक्य नाही. आजपर्यंत मराठी माणसाच्या अस्मितेचे राजकारण महाराष्ट्रातील शहरी , सवर्ण ब्राह्मणी माध्यम आणि अभिजन वर्गाकडे केंद्रित राहिल्याने मराठी माणसाचे प्रश्न हे मूलभूतपणे मराठी बहुजन समाजाचे प्रश्न आहेत याचा सोयीस्कर विसर महारष्ट्रातील सवर्ण अभिजन सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळींना झाला आहे .
म्हणून आम्ही मराठी चळवळीतील आमच्या साथीदारांना खुले आवाहन करतो कि त्यांनी ओबीसी जनगणनेचा विषय मराठी भाषा आणि नवीन महाराष्ट्र कारण याच्या पटलावर घ्यावा . जर असे होत नसेल तर सुरु असलेली मराठी भाषेची चळवळ आणि नवीन महाराष्ट्र कारण हे जुन्याच पठडीतील शहरी मध्यम वर्गीय निवडक मराठी सवर्ण अभिजनांची चळवळ आहे का? असा प्रश्न आमच्यासारख्या मराठी बहुजन समाजातील मराठीवादी आणि महाराष्ट्रवादी तरुणांना पडू शकतो. आम्ही प्रामाणिकपणे अशी अपेक्षा करतो कि आमचा समज खोटा ठरावा. आणि नव्या दमाचे शेतकरी , कामगार, महिला , युवक आणि दलित -बहुजन कल्याणाचे ‘मराठी कारण’ महाराष्ट्राच्या मराठी मातीला नव्याने मिळावे .
आम्हाला असे वाटते की हे जाहीर आवाहन पत्र लिहून आम्ही आपली ओबीसी जातीय जनगणनेबद्दल आपली काय भूमिका आहे हे समजू इच्छितो. आम्ही अशी अपेक्षा करतो कि याचे उत्तर आम्हाला रिप्लाय च्या स्वरूपात मिळेल . आणि जरी ते उत्तर अनुल्लेखाने मिळाले तरी ते आमच्यासाठी अधिक स्पष्ट असेल, जेणेकरून घाट घटलेल्या नवीन मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माच्या राजकारण , विचार कारण आणि संस्कृती कारणामध्ये मराठी बहुजन समाज आणि त्याचे हित कुठे आहे याची आम्हाला तरी पूर्ण स्पष्टता येईल.
ज्या शिव, फुले, शाहू , आंबेडकरांनी उभ्या महाराष्ट्रात ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात खुला विद्रोह पेरला त्या महाराष्ट्रात आज मराठी समाज मन हिंदुत्ववादाचे गुलाम बनवून ब्राह्मणी भटुकशाहीचे बटीक बनवले जात आहे . महाराष्ट्र आणि मराठी समाजासाठी काळ कसोटीचा असताना मराठी समाजाची सामाजिक, राजकीय आणि वैचारिक जाणीव अधिक धारदार आणि स्पष्ट व्हावी अशी माफक अपेक्षा आम्ही या जाहीर पत्रातून करतो.
आपण करीत असलेल्या आपल्या कामाला मनःपूर्वक शुभेच्छा !
–आनंद क्षीरसागर
सदर लेखक यांनी हॅरिस स्कुल ऑफ पब्लिक पॉलिसी , युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो, यु. एस .ए येथून पब्लिक पॉलिसी या विषयाचा अभ्यास केला असून टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स , मुंबई मधून डेव्हलोपमेंट स्टडीस या विषयाचा अभ्यास केला आहे.

Leave a Reply