लेख — ओळख, इतिहास आणि मानसिक स्वास्थ्य
प्रबुद्ध हो धनगरा …
अजंनगावातला पुतळ्याचा वाद हा केवळ जागेचा आणि अस्मितेचा नाहीये. तो एका समाजाच्या मनात
शतकानुशतके घर करून बसलेल्या एका खोल प्रश्नाचं उत्तर शोधण्याची धडपड आहे, आपण नक्की कोण आहोत?
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील अजंनगाव (खेलोबा) हे गाव. खेलोबा देवाच्या देवस्थानाचं गाव.
रातोरात गावाच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला आणि गाव दुभंगल.
एक गट म्हणतो पुतळा राहूदे, दुसरा गट म्हणतो खेलोबाच्या जागेतनू पुतळा काढा. जो पर्यंत पुतळा हलत नाही
तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी धनगर समाजाची मागणी. गावात पोलिस बंदोबस्त तैनात. तणाव,
दगडफेक आणि जाळपोळ.
पण हा तणाव नक्की कशाचा आहे? पुतळ्याचा? जागेचा? की त्यापलीकडे काहीतरी जास्त खोल, जास्त जुन आहे? जे या निमित्ताने वर आलयं ?
खेलोबाची जमीन आणि मराठ्याचा पुतळा
खेलोबा हा धनगरांचा देव आहे, पण तो नुसता देव नाही. तो एक भटका मेंढपाळ होता, ज्याला त्याच्या पिढ्यांनी देव बनवल.त्याच्या कथा ओव्यांमधून , गजी ढोलाच्या तालावर, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने पोचल्या. सर्यू चंद्र त्याचे सखे, आकाश बाप, धरणी माय हे त्याचं जग. या मातीवर, या भटकंतीवर उभ्या असलेल्या खेलोबाच्या देवस्थानाच्या जागी शिवाजी महाराजांचा पुतळा आला आणि त्यातनू एक प्रश्न निर्माण झाला जो केवळ स्थानिक नाही, तो धनगर समाजाच्या मनाच्या आत खोलवर रुतलेल्या ओळखीच्या सकंटाशी जोडलेला आहे.
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आदर्श आहेत. धनगरांसकट सगळ्यांचे. पण या पुतळ्याचा वाद हा महाराजांच्या विरुद्ध नाही. वाद आहे तो एका वेगळ्याच प्रश्नाचा. धनगर समाजाची स्वतःची ओळख कुठे आहे? आणि दुसऱ्याच्या प्रतीकांच्या भोवती घटुमळत राहणं हे त्या ओळखीला बळकट करतं की कमकुवत करतं?
Sontheimer ने जे पाहिलं ते आपण विसरलो
जर्मन मानववशं शास्त्रज्ञ Günther-Dietz Sontheimer यांनी १९५८ साली पहिल्यांदा D.D. Kosambi
यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या धनगरांशी सपंर्क केला. पुढे तीस वर्षे त्यांनी धनगरांच्या स्थलांतर मार्गां वर, देवतांवर, लोकगीतांवर अभ्यास केला. त्यांचं “Pastoral Deities in Western India” (Oxford University Press, 1989)
हे पुस्तक आज धनगर संस्कृतीवरचं सर्वात महत्त्वाचं लिहिलेलं काम मानलं जातं.
Sontheimer एक गोष्ट ठामपणे सांगतात — धनगरांच्या देवता या स्थलांतर मार्गांशी थेट जोडलेल्या आहेत. खेलोबा, बिरोबा, म्हस्कोबा हे सगळे देव त्याठिकाणी आहेत जिथे धनगरांचा कारवा (कळप) थांबत असे, जिथे त्यांनी पावसाळ्याचे महिने घालवले, जिथे त्यांचा एखादा पर्वूज मेंढरं चारताना मरण पावला तिथे हे सगळे देव आहेत. म्हणजे धनगरांची संपूर्ण धर्म व्यवस्था ही भटकंतीतनू जन्मली आहे, स्थिरतेतून नाही. ही एक स्वतत्रं , समृद्ध आणि आदिम जगण्याची दृष्टी आहे, जी वैदिक परंपरेपेक्षा वेगळी आणि किमान तेवढीच जुनी आहे.
“Dhangar deities are often located along actual migration routes. When a caravan stops at a shrine, the myth becomes part of the landscape.”
— Günther-Dietz Sontheimer, Pastoral Deities in Western India, 1989
हे वाचलं की एक प्रश्न मनात येतो, जर धनगरांचं हे सांस्कृतिक जग इतकं स्वतंत्र आणि इतकं खोल आहे, तर मग “आपण मराठ्यांसारखे आहोत” हे सिद्ध करण्यात इतक्या पिढ्यांची शक्ती का गेली? हे समजनू घ्यायचं असेल तर इतिहासात जरा मागे जावं लागेल.
गाव स्थिर झालंआणि ओळख गोंधळली – धनगर समाज मूळचा भटका. पण काळाच्या ओघात, जाती व्यवस्था पाळणाऱ्या गावांमध्ये स्थिरावत गेला. आणि इथेच एक महत्त्वाची गोष्ट घडली. भटक्या संस्कृतीला स्थिर गावव्यवस्थेत जागा नव्हती. ब्राह्मणी वर्चस्वावर उभ्या असलेल्या जाती व्यवस्थेत धनगर हे “शूद्र” होत. त्यांची भटकंती “रानटीपणा” म्हणनू बघितली गेली. त्यांच्या देवतांना “लोकदेवता” म्हणनू मुख्यधारेपासनू दूर ठेवलं गेलं.
संजय सोनवणी यांनी “जाति संस्थेचा इतिहास” या पुस्तकात सांगितलं आहे की भारतातील जाती व्यवस्था ही
केवळ ब्राह्मण- शूद्र अशी दोन ध्रुवांची नव्हती तर ती एक सतत बदलणारी, राजकीय सोयीनुसार पनुर्रचना होत
राहणारी रचना होती. ज्या समाजाने सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधली, त्यांची जात वर गेली; ज्यांनी नाही, ते खाली
राहिले. धनगर समाज या व्यवस्थेत नेहमी बाहेरचा राहिला कारण त्याचं जगणं भटकं होतं, गाव-केंद्री नव्हतं.
मग हळूहळू जे घडलं ते म्हणजे या बाहेरच्यापणाला सामोरं जाण्याचा एक मार्ग शोधला गेला. तो मार्ग होता क्षत्रियीकरण — म्हणजे “आपण मराठ्यांसारखेच आहोत, आपलाही इतिहास तेवढाच थोर आहे” असं सांगण्याचा
प्रयत्न. होळकरांचं उदाहरण समोर होतं. इतिहासकार Richard Eaton यांनी नोंदवलं आहे की होळकर घराणं
मूळचं धनगर होतं, पण राजकीय सोयीसाठी त्यांना “मराठा” ओळख देण्यात आली. हा इतिहास धनगर समाजाला अभिमानाचा वाटला पण इथेच एक सूक्ष्म घसरण सुरू झाली.
अभिमान की आत्मविसर्जन
“आपण होळकरांसारखे आहोत, म्हणजे आपण मराठ्यांसारखे आहोत” हे सांगताना नकळत एक गोष्ट मान्य केली गेली, की मराठेपण हे धनगरपणापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हीच मानसिक घसरण आहे. Frantz Fanon यांनी “The Wretched of the Earth” मध्ये याला “colonised mind” म्हटलं — जेव्हा शोषित माणसू शोषकाची मूल्यव्यवस्था स्वीकारतो आणि त्याच मापदंडाने स्वतःला मोजू लागतो, तेव्हा तो आधीच पराभतू असतो. धनगरांच्या पिढ्यांनी हेच केलं त्यांनी स्वतःच्या ओळखीला मराठ्यांच्या इतिहासात, मराठ्यांच्या देवांमध्ये, मराठ्यांच्या प्रतीकांमध्ये स्वतःला शोधत ठेवल.आणि सगळ्या पिढ्या तेच शोधत राहिल्या. जोतिबा फुल्यांनी १८७३ साली “गुलामगिरी” मध्ये याला वेगळ्या भाषेत सांगितलं — ज्या माणसाला आपल्या स्वतःच्या जगण्याची, मेहनतीची, आपल्या कसबाची लाज वाटू लागते तो आधीच पराभतू झालेला असतो, तो आधीच गुलाम आहे. मेंढरं चारण, घोंगडी विणण,माळावर झोपणं— या गोष्टी “कमी” आहेत असं वाटू लागल, तेव्हाच धनगर समाजाने स्वतःच स्वतःच्या सस्कृतीची किंमत कमी केली.
पिढ्यानपिढ्यांची जखम – intergenerational trauma
इथे आता आपल्याला फक्त इतिहास नाही, तर मानसशास्त्राकडे यायला हव. कारण जे घडलं ते केवळ सामाजिक घटना नाही — ते धनगर समाजाच्या सामूहिक मनावर खोल उमटलं आहे. शतकानुशतके “तुमचं जगणं कमी आहे, रानटी आहे, मागास आहे” हे ऐकत, अनुभवत आलेल्या समाजाच्या मनात एक “दीर्घकालीन जखम” (chronic wound) तयार होते— जी एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाते.
मानसशास्त्रज्ञ Rachel Yehuda यांच्या सशोधनाने हे सिद्ध केलं आहे की “गंभीरआघात” (severe trauma) चे जैविक परिणाम पुढच्या पिढ्यांमध्येही दिसतात. याला “ पिढ्यानपिढ्या चालत आलेला मानसिक आघात” (intergenerational trauma) म्हणतात. सामाजिक पातळीवर हे म्हणजे, एखाद्या समाजाने पिढ्यानपिढ्या जो अपमान, उपेक्षा आणि ओळखीचं सकंट अनुभवल, ते पुढच्या पिढ्यांच्या वागण्यात, भावनांमध्ये आणि “स्वतःची किंमत” (self-worth) मध्ये दिसतं. त्या पिढ्यांनी तो अनभुव थेट घेतलेला नसतो, पण तरी त्या आधीच्या पिढीच्या जखमेचं ओझं त्यांच्यावर असतं. Resmaa Menakem यांनी “My Grandmother’s Hands” मध्ये याच जखमेबद्दल सांगितलं— की या प्रकारचा trauma शरीरात, हाडांमध्ये घर करतो आणि collective storytelling, म्हणजे एकत्र बसून आपल्याच समाजाच्या कथा ऐकण-ं सांगण, हे त्यावरचं सर्वात प्रभावी उत्तर आहे. धनगरांच्या प्रत्येक मेंढक्याकड, आजी-आजोबा कडे एक कथा आहे, ती कथा जगली, लिहिली, पुढे गेली, तर ती आपल्याला अशा जुन्या जखमांतनू , आघातातून निरोगी आणि बलवान करते.
अजंनगावातला वाद याच लेन्सने बघा. पुतळा हटवण्याची मागणी ही फक्त जागेची नाही, ती एका समाजाने स्वतःची जागा शोधण्याची, स्वतःची ओळख ठासनू सांगण्याची धडपड आहे. आणि त्यात जी तीव्रता आहे, जी hypersensitivity आहे, ती पिढ्यानपिढ्यांच्या दडपलेल्या जखमांमधनू येते हे विध्वसंक नाही हे जगण्याचं लक्षण आहे.
मग काय करायच? — प्रबद्ध होण्याचा मार्ग
Paulo Freire यांनी “Pedagogy of the Oppressed” मध्ये “conscientization” ही सकंल्पना मांडली. ते सांगतात की शोषित माणसाची खरी मुक्ती म्हणजे शोषकाच्या रांगेत जाऊन बसणं नाही तर त्या रांगेची रचनाच बदलण. पण हे एकट्यान होत नाही. हे संवादातून होतं, एकमेकांच्या कथा ऐकण्यातून होतं, आपल्या परिस्थितीचं एकत्र “तर्कसगंत व सखोल विश्लेषण” (critical analysis) करण्यातनू होतं. Freire यांच्या Brazil मधील अनभुवात गरीब शेतकरी “सांस्कृतिक गटात” (cultural circles) मध्ये एकत्र येऊन फक्त वाचायला शिकले नाहीत तर त्यांनी स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधला. धनगर समाजासाठी हे म्हणजे गावागावात ओवी गायन मंडळे, खेलोबाच्या कथा सांगण्याचे कट्टे, तरुणांनी आपल्या आजी-आजोबांशी बोलण्याची सवय हे सातत्याने करावे लागेल.
“ब्राह्मणीकरणातनू मुक्ती ” (De-brahmanisation) म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष नाही. ते म्हणजे ब्राह्मणी मूल्यव्यवस्था, जी भटकंतीला कमी मानते, लोकदेवतांना “रानटी” म्हणते, शेतकरी -मेंढपाळांच्या संस्कृतीला “अशद्ध” मानते ती मूल्यव्यवस्था आपल्या मनातनू काढून टाकणे. कांचा इलय्या शेफर्ड यांनी मी हिंदू का नाही “Why I Am Not a Hindu” या पुस्तकामध्ये सांगितलं की बहुजन समाजांची संस्कृती, त्यांचं काम, त्यांचे देव,त्यांची भाषा ही स्वतंत्र आणि समृद्ध आहे. तीने ब्राह्मणी ” मुख्यधारेत” विलीन होणं हे प्रगती नाही तर तो सांस्कृतिक मृत्यू आहे. Sontheimer यांनी दाखवनू दिलं की धनगरांची सस्कृती ही “आर्य पूर्व “(pre-Aryan), स्वतंत्र आणि समृद्ध आहे. ती कुणाची उपशाखा नाही तर ती स्वतःच एक मुख्यधारा आहे. Ambedkar यांनी “Annihilation of Caste” मध्ये म्हटलं होतं की जाती व्यवस्थेचा नाश केवळ कायद्याने होत नाही तो माणसाच्या मनातनू होतो.” तो नाश करायचा असेल तर हळूहळू प्रबुद्ध होण्याकडे छोटी छोटी पावले टाकावी लागतील.
प्रबुद्ध होणं म्हणजे काय?
अजंनगावातला पुतळ्याचा वाद एक दिवस संपेल. पोलिस जातील, आंदोलन मागे घेतलं जाईल, कदाचित पुतळा हलणारही नाही किंवा हलेलही. पण जर या संपूर्ण घटनेने धनगर समाजाला एक प्रश्न विचारायला लावला, “आपली ओळख नक्की काय आहे?” तर ती घटना रिकामी नाही. प्रबुद्ध होणं म्हणजे डोळे उघडणे. ते म्हणजे सोन्थेमेर ने ज्या सस्कृतीला इतक्या प्रेमाने अभ्यासल, त्या सस्कृतीकडे स्वतः अभिमानाने बघण. प्रबुद्ध होणं म्हणजे संजय सोनवणी यांनी जी जाती व्यवस्थेची वीण उलगडली, त्यातून स्वतःची जागा ओळखणे, प्रबुद्ध होणे म्हणजे फुले-आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने दुसऱ्याच्या मापदंडाने नाही, स्वतःच्या इतिहासाने स्वतःला मोजणे आणि फ्रेइरे ज्याला “स्वतःसाठी असलेले अस्तित्व” (“beings for themselves”) म्हणतात तसं होण. दुसऱ्यासाठी, दुसऱ्या सारखं जगणं सोडून, स्वतःसाठी जगण.
खेलोबाची कथा माळावरून माळावर भटकत आली. पडत झडत, लोकरीतनू , घोंगड्यातून ती कथा आजही जिवंत
आहे. तिला दुसऱ्याच्या पुतळ्याची गरज नाही. तिला फक्त एक समाज हवा आहे जो ती कथा प्रबुद्ध दृष्टीने पुढे नेईल.
लेखक – अमोल शिंगाडे
(जातीअंत आणि समदुाय मानसिक आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहेत)
सपंर्क amolshingade1697@gmail.com
सदंर्भ ग्रंथ आणि स्रोत:
Günther-Dietz Sontheimer — Pastoral Deities in Western India (Oxford University Press, 1989)
Sontheimer & Leshnik (eds.) — Pastoralists and Nomads in South Asia (Wiesbaden, 1975)
Sontheimer — “The Dhangars: A Nomadic Pastoral Community in a Developing Agricultural
Environment” (1975)
Sanjay Sonawani — जातिसंस्थेचा इतिहास (Sahyadri Books)
Jotirao Phule — गुलामगिरी(१८७३)
B.R. Ambedkar — Annihilation of Caste (१९३६)
Paulo Freire — Pedagogy of the Oppressed (१९६८)
Frantz Fanon — The Wretched of the Earth (१९६१)
Kancha Ilaiah Shepherd — Why I Am Not a Hindu (१९९६)

Maratha itself is a regional name for Maharashtrians who speak Marathi. Not a jati. Their original jati is Kunbi
अतिशय अभ्यासपूर्ण आणि आवश्यक भूमिका घेऊन लिहिलेला लेख वाचनात आलाय.