ब्राम्हणी व्यवस्थेत बौद्ध विरासतीवर आक्रमण

आदिती रमेश गांजापूरकर

ब्राम्हणी व्यवस्थेत बौद्ध विरासतीवर आक्रमण हा विषय हा धम्म चळवळीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी या देशात क्रांती करून मानवतेचे बीज पेरले, सम्राट अशोकाच्या माध्यमातून धम्माला राजाश्रय प्राप्त झाल्याने संपूर्ण जगभर धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. या देशाला ‘सोने की चिडीया’ म्हंटले गेले तो हाच धम्माचा सुवर्णकाळ होता.


ब्राह्मण सेनापती पुष्पमित्र शृंगाने प्रतिक्रांती करून ब्राह्मणी व्यवस्थेची सुरुवात केली. सम्राट अशोकाने भगवान बुद्धांचा संदेश अजरामर रहावा यासाठी ८०००० चैत्य, स्तूप, विहार, लेण्या यांची निर्मिती करून बुद्धांचा सिद्धांत पाषाणात कोरून ठेवला.
यापैकी काही चैत्य, स्तूप आणि लेण्यांवर अतिक्रमण करून ब्राह्मणी व्यवस्थेने त्यालाच ब्राह्मणी धर्माचे स्वरूप दिल्याचे कित्येक संशोधनातून आणि पुरातत्व विभागाच्या अभ्यासातून उघड झाले आहे. ब्राह्मणी व्यवस्थेने बौद्ध विरासतींवर अतिक्रमण करून इतिहास पुसण्याचा आणि इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा ब्राह्मणी कावा करत संकुचित प्रयत्न केलेला असला तरीही या देशाचा भूगोल पाषाणाच्या माध्यमातून आजही बुद्धांचा सिद्धांत जगाला सांगतोय.
आजही या देशाच्या भूगर्भात बुद्धांचा इतिहास दडलेला असुन काळ लोटला, ब्राह्मणी व्यवस्था निर्माण झाली तरीही उत्खनन केले की बुद्धच सापडत आहेत. कोणत्याही देशाचा इतिहास हा त्या देशाच्या गर्भात शोधला जातो. आजही उत्खनन केल्यास आपल्याला बुद्धमूर्ती, शिलालेख, स्तंभ या मातीच्या गर्भात आढळून येतात आणि त्यामुळेच जगात बुध्दाचा देश म्हणून भारताची ओळख आहे.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
“भारताचा इतिहास हा बौद्धधर्म आणि ब्राह्मणधर्म यांच्यातील अखंड संघर्षाचा इतिहास आहे.”

बुद्धीजम vs ब्राह्मणीजम हा या देशाचा खरा इतिहास आहे आणि पूर्वापारपासुन हा संघर्ष आजतागायत सुरूच आहे. नैतिकता विरुद्ध अनैतिकता, सत्य विरुद्ध असत्य, विज्ञान विरुद्ध कर्मकांड, समानता विरुद्ध असमानता असे या संघर्षाचे स्वरूप आहे.
डॉ.बाबासाहेबांनी या देशात धम्मचक्र पुर्नजीवित केल्यानंतर तर ब्राह्मणी सत्तेने संधी भेटेल त्यावेळी बौद्ध विरासत खोडसाळपणे नष्ट करण्याचा षडयंत्र रचले पुन्हा एकदा ब्राह्मणवादाची उभारणी करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेतच. यातुनच मग बौद्ध साहित्याचे बौद्ध स्मारकांचे विद्रुपीकरण करणे, महाबोधी महाविहार बोधगया येथील विहारात जाणीवपूर्वक कर्मकांड करणे, जगातील पहिले वैज्ञानिक तथागत बुद्धानी कर्मकांडाला विरोध केला त्याच ऐतिहासिक लेण्यांवर अतिक्रमण करून बौद्ध विरासतीची मूळ आयडेंटिटी नष्ट करून तिथे ब्राह्मणवादाची पायाभरणी करणे, मालिका व नाटके आणि चित्रपटातून तथागत गौतम बुद्ध यांच्याबद्दल खोडसाळ प्रचार करणे या सर्व गोष्टी प्रतिक्रांतीची पाऊले आहेत.
डॉ.बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने हे ओळखले व आपल्याला 22 प्रतिज्ञांची शिकवण दिली. आज धम्म चळवळीच्या दृष्टीने बाबासाहेबांचे बौद्धमय भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी याबाबतीत प्रत्येक बौद्धांनी सजग राहुन हे कुटिल षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत. ही बाबासाहेबांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी आणि विश्वास आहे.
बाबासाहेब म्हणतात “जे लोक आपला इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत”.

त्याच वास्तविकतेची प्रतिमा बौद्ध विचारधारा बौद्ध धम्मप्रणाली तथागत गौतम बुद्धांची शिकवण आपल्या सांस्कृतिक चळवळीतून चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील भयान आणि वास्तव समोर घेऊन येणारा चित्रपट थंगलान नुकताच एक वर्षापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेला.
चित्रपट थंगलान चित्रपट म्हणजे इथल्या तथाकथीत उच्चवर्णीय जातीयदंभ व खोट्या प्रतिष्ठेवर हल्ला करतो तेव्हा अख्खा जातीवादी मीडिया हादरतो आणि अशाच अभिव्यक्तीची संवेदनशीलतेची प्रस्थापितांना भीती आहे कारण अशी अभिव्यक्ती भूमीच्या गर्भातला इतिहास उजागर करते.
इथल्या वैदिक ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या गुलामगिरीविरूध्द बुद्ध विचारधारेने केलेला मुक्ती संघर्ष हाच खरा भारतीय इतिहास आहे.

~ आदिती रमेश गांजापूरकर
शहर नांदेड

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*